एरंडोल विधानसभा मतदार संघातील निवडणूक रंगतदार

एकीकडे तगड्या उमेदवारांचा राजकारणाचा दांडगा अनुभव तर दुसरीकडे मातोश्री बंगल्यावर घरगडयाचं काम करणारा उमेदवार. त्यातच मनसेच्या उमेदवाराकडून होणारा स्थानिक बोलीभाषेतून प्रचार यामुळे एरंडोल विधानसभा मतदार संघातील निवडणूक मोठी रंगतदार होतेय. 

Updated: Oct 6, 2014, 03:33 PM IST

जळगाव : एकीकडे तगड्या उमेदवारांचा राजकारणाचा दांडगा अनुभव तर दुसरीकडे मातोश्री बंगल्यावर घरगडयाचं काम करणारा उमेदवार. त्यातच मनसेच्या उमेदवाराकडून होणारा स्थानिक बोलीभाषेतून प्रचार यामुळे एरंडोल विधानसभा मतदार संघातील निवडणूक मोठी रंगतदार होतेय. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना मच्छिंद्र पाटील हे मातोश्री वर दोन वर्षे घरगडी म्हणून कामाला होते. त्यामुळे राजकारण म्हणजे काय हे त्यांनी अगदी जवळून पाहिलंय. तरीही मच्छिंद्र पाटील यांना राजकारणात फारसा रस नव्हता. मात्र गावाकडे परतल्यावर त्यांनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. विधानसभा निवडणुका आल्या. महायुती फुटली आणि पाटील यांना तिकीटाची लॉटरी लागली. सध्या ते एरंडोल विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.

याच मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील, राष्ट्रवादी कडून डॉ. सतीश पाटील रिंगणात आहेत, तर मनसेचे नरेंद्र पाटील पहिल्यांदाच आपलं नशिब आजमावतायेत.. मनसेकडून अहिराणी या खानदेशातल्या बोली भाषेतून होणारा प्रचार मतदारांसाठी लक्षवेधी ठरतोय. 

शिवसेना आणि राष्ट्रवादीने एरंडोल मतदार संघात मातब्बर उमेदवार उभे केलेत. अशात मनसेनं प्रचारासाठी वापरलेला बोली भाषेचा फंडा आणि ७ ऑक्टोबरला याच मतदारसंघात होणारी पंतप्रधान नरेद्रमोदींची सभा.. त्यामुळे सेना आणि राष्ट्रवादीसमोर या नवख्या उमेदवारांनीही तगडं आव्हान उभ केलंय. 

 इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.