Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...'

Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 21, 2024, 11:33 AM IST
Tirupati Laddus Row: तिरुपतीचेच लाडू अयोध्या राम मंदिरात...; मुख्य पूजाऱ्यांचा मोठा खुलासा, 'साधा कांदा, लसूण...' title=

Tirupati Laddus Prasad: तिरुपती मंदिरातील (Tirupati Temple) प्रसादावरुन वाद निर्माण झाला आहे. मंदिरात दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप टीडीपी सरकारने (TDP Government) केला आहे. दरम्यान पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, तिरुपती मंदिरातील प्रसाद अयोध्या राम मंदिरात वाटण्यात आला होता अशी माहिती अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे. 

जानेवारी महिन्यात पार पडलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तिरुपती मंदिरातून आलेला 300 किलोंचा प्रसाद वाटण्यात आला होता यालाही मुख्य पुजाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील सरकारने तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याचा आरोप केल्याने मोठा वाद पेटला आहे. शुक्रवारी आचार्य सत्येंद्र दास यांनी याप्रकरणी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरण्यात येत असल्याच्या आरोपांनंतर संताप व्यक्त केला आहे. 

"जर प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळण्यात आली असेल तर हे माफीयोग्य नाही. यामध्ये सहभागी असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे," असं सत्येंद्र दास यांनी म्हटलं आहे. अयोध्या राम मंदिराच्या मुख्य पूजाऱ्यांनी यावेळी संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे. 

"वैष्णव संत आणि भक्त कांदा आणि लसूणही वापरत नाहीत. अशा स्थितीत जर प्रसादात प्राण्यांची चरबी वापरण्यात येत असेल तर ते फार दुर्दैवी आहे. हा हिंदू धर्माचा मोठा अपमान आहे," असं सत्येंद्र दास म्हणाले आहेत. एका मोठ्या तपास यंत्रणेने प्रकरणाची चौकशी करावी आणि जर दोषी आढळल्यास कारवाई करावी असंही ते म्हणाले आहेत. 

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी 2019 ते 2024 दरम्यान जेव्हा कधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तेव्हा त्यांनी लाडू भेट दिले. 

नेमका वाद कुठून सुरु झाला?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी लाडूंमध्ये निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरण्यास परवानगी दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी वाद सुरू झाला.

गुजरातमधील प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देऊन, नायडू यांच्या पक्षाने तुपात “बीफ टॉलो”, “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि माशाचे तेल असल्याचा दावा केला. जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदावर असताना लाडूंमध्ये निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरण्यास परवानगी दिल्याचा आरोप  आहे. रेड्डी यांनी आरोप फेटाळून लावले आहे. 

केंद्र सरकारनेही याची दखल घेतली असून आंध्र प्रदेश सरकारकडून लाडूत नेमके कोणते पदार्थ वापरले आहेत याची माहिती मागवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोलून आरोपांबाबत अहवाल मागवला आहे. 

“मला सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली. मी आज चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आणि त्यांना उपलब्ध अहवाल शेअर करण्यास सांगितले जेणेकरुन आम्ही त्याचे परीक्षण करू शकू. मी राज्य नियामकांशीही बोलेन आणि त्यांची मते जाणून घेईन. अहवालाची तपासणी केली जाईल आणि FSSAI अंतर्गत कायदेशीर चौकटी आणि नियमांमध्ये योग्य ती कारवाई केली जाईल,” असं नड्डा म्हणाले आहेत.