लातूर : मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या मराठवाडा दौ-याला लातूरपासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज काढून मदत केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
दुष्काळाची पाहाणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस भला मोठा ताफा घेऊन आलेत. आधी वरूणदेवाची प्रार्थना करून शेतकरी थकले, पण तो आलाच नाही. आता दुष्काळी परिस्थितीत 'देवेंद्र' काहीतरी मदत करील, म्हणून शेतकरी आशाळभूतपणे वाटच पाहत होते. लातूरच्या येरोळ गावात मुख्यमंत्री येताच शेतक-यांनी बॅरिकेड्स झुगारली आणि त्यांना घेराव घातला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी खराखुरा नाही, पण आश्वासनांचा पाऊसच पाडला.
अवघ्या वीस मिनिटात येरोळचा दौरा आटोपून मुख्यमंत्री निटूर गावाकडे रवाना झाला. इथंही तीच परिस्थिती... विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस आघाडी सरकारच्या दुष्काळ पाहणीवर टीका करायचे. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनीही आघाडीचीच पद्धत अवलंबली.
मुख्यमंत्र्यांची ही पाहणी म्हणजे निव्वळ दुष्काळ पर्यटन असल्याची नाराजी शेतक-यांनी व्यक्त केली. खरं तर मराठवाड्याच्या जनतेला भाजप-शिवसेना सरकारकडून खूप अपेक्षा आहेत.
वरच्या धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडावं. केवळ घोषणा न करता शेतक-यांच्या हातात भरघोस मदत तातडीनं कशी मिळेल याचं नियोजन करावं... रब्बी पिकासाठी काही तरतूद करता येईल का, याचं नियोजन करावं तसंच शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी अपेक्षा इथल्या बळीराजाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.