'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा!

लष्करात नोकरीचं आमिष दाखवून तिनं बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातला आणि फरार झाली. नाशिक पोलीस तिचा शोध घेतायत. असे प्रकार नेहमीच आपल्या आसपास घडत असतात पण तरीही अशा आमिषाला आपण बळी पडतोच...

Updated: May 21, 2017, 12:54 PM IST
'लागिरं' झालेल्यांना तिनं घातला लाखोंचा गंडा! title=

मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : लष्करात नोकरीचं आमिष दाखवून तिनं बेरोजगार तरुणांना लाखोंचा गंडा घातला आणि फरार झाली. नाशिक पोलीस तिचा शोध घेतायत. असे प्रकार नेहमीच आपल्या आसपास घडत असतात पण तरीही अशा आमिषाला आपण बळी पडतोच...

लष्करात नोकरी लावून देण्य़ाचं आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना तिनं गंडा घातला... आणि आता ती फरार आहे. नाशिक पोलीस तिचा शोध घेत आहेत. सध्या तरी चार-पाच तरुणांनी पुढे येऊन याबाबत तक्रार दाखल केलीय. मात्र आणखी कुणाला या महिलेनं गंडवलंय का? याचाही तपास पोलीस करत आहेत.

लष्करात डॉक्टर म्हणून बनाव

फसवणूक करणाऱ्या या महिलेचं नाव आहे रुपाली शिरुरे... ती स्वत:ला लष्करी दवाखान्यात डॉक्टर असल्याचं सांगायची... तिनं शिकवणी घेण्याच्या बहाण्याने लोकांशी ओळख वाढवली. आपले पतीही लष्करात मोठ्या पदावर असल्याचं ती सांगायची... आजवर तिनं १६ हून अधिक बेरोजगार तरुणांना गंडवलंय. एप्रिल मे महिन्यात नोकरीसाठी कॉल येईल असं तिनं सर्वांना सांगितलं. वाट पाहून या तरुणांनी तिला कॉल केला पण तोवर ती नाशिकमधून पसार झाली होती.

म्हसरुळ पोलिसांत १६ लाखांच्या फसवणुकीचा रुपालीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही तरुणांनी चेक स्वरुपात तिच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यामुळं तिचं खातं गोठवून तिच्यापर्यंत पोहण्याचा प्रयत्न पोलीस करतायत.  

नोकरीचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार याआधीही घडलेत. पण यातून अजुनही तरुणांनी धडा घेतलाच नाही असंच या प्रकरणातून दिसतंय.