देवांनाही थंडीचा कडाका, नागपूर मधील मंदिरात देवांनी ओढली शॉल!

राज्यात थंडीचा कडाका कायम असून यंदा राज्यातील हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वर पेक्षाही इतर शहरांमध्ये अधिक थंडीची नोंद झाली आहे. जिथं प्रत्येक जण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्स, शॉल तसंच इतर गरम कपड्यांचा वापर करत आहेत तिथं देवही थंडीपासून वाचू शकले नाहीयेत.

Updated: Dec 29, 2015, 04:54 PM IST
देवांनाही थंडीचा कडाका, नागपूर मधील मंदिरात देवांनी ओढली शॉल! title=
नागपूर मधील मंदिरातील राम, सीता व लक्ष्मण यांच्या मुर्ती. Aparna Deshpande/iamin

नागपूर, Aparna Deshpande/iamin : राज्यात थंडीचा कडाका कायम असून यंदा राज्यातील हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वर पेक्षाही इतर शहरांमध्ये अधिक थंडीची नोंद झाली आहे. जिथं प्रत्येक जण थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर्स, शॉल तसंच इतर गरम कपड्यांचा वापर करत आहेत तिथं देवही थंडीपासून वाचू शकले नाहीयेत.

पश्चिम नागपुरातील रामनगर भागातील प्रसिद्ध राम मंदिरात देवांना थंडीपासून वाचविण्यासाठी शॉल गुंडाळण्यात आलीय. राम मंदिरातील पुजारी श्यामसुंदर तिवारी यांनी सांगितलं कि जशी आपल्याला थंडीपासून रक्षणाची गरज आहे तशीच भगवंताला गरम कपड्यांची उब देण्यात येतेय. इथल्या राम, लक्ष्मण, सीता या तिन्ही देवांच्या मूर्त्यांना सुंदर अशा गुलाबी शॉलनं सजवण्यात आलंय.

रामनगर इथलं हे राम मंदिर शहरातील प्रसिद्ध मंदिर आहे. इथं कायमच भाविकांची गर्दी पाहायला मिळते. शॉलमधील मूर्ती पाहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही आनंद होतोय.

शहरात दोन दिवसांच्या कडाक्याच्या थंडीनंतर मंगळवारी तापमानात थोडी वाढ नोंदवण्यात आलीय. शनिवारी नागपूरचं तापमान ७.७ डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं. त्यानंतर आज तापमानात वाढ झालेली आहे.

हवामान खात्यानुसार, हवेच्या दिशेमध्ये थोडा बदल झाला आहे. सध्या हवा उत्तर-पूर्वेला आहे. नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. विदर्भातील थंडीची लाट आज कमी झाली असली तरी बहुतांश ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसाही गार वारे वाहत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंडी वाऱ्यांमुळे आणि कोरड्या हवामानामुळे इथे थंडी जाणावत आहे.