पुणे : येत्या ३ जानेवारीला पुण्यात एक इतिहास घडणार आहे. शिवशक्ती संगम या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे दीड लाख स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी होणार आहेत.
संघटनात्मक ताकद तसंच व्यवस्थापनात्मक कौशल्याचा अविष्कार ठरू पाहणा-या या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
कार्यक्रमाचे वैशिष्ट?
२०० फूट रूंद, ८० फूट उंच, भव्य ३ मजली व्यासपीठ
७० फूट उंचीचा ध्वजस्तंभ
१०० एकरवरील विस्तीर्ण संघस्थान
१५० एकरवर सिद्धता केंद्र
२०० एकरवर वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था
संघस्थानाभोवती १३ प्रवेशद्वारांना जोडणारी भक्कम तटबंदी
२००० स्वयंसेवकांचा सहभाग असलेलं घोष पथक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगमसाठी हा घाट घालण्यात आलाय.
पुण्याजवळच्या मारूंजी परिसरात त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे. या एकदिवसीय शिबिरासाठी ३५ विविध खात्यांच्या माध्यमातून ८००० स्वयंसेवक गेले अनेक महिने झटत आहेत. कार्यक्रमस्थळाच्या उभारणीसह भोजन, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, प्रवास अशा प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी व्यवस्था म्हणून अगदी बारकाईने विचार करण्यात आलाय.
१ लाख ६० हजार जणांची नोंदणी
पश्चिम महाराष्ट्रातील एकूण १ लाख ६० हजार स्वयंसेवकांनी शिवशक्ती संगमसाठी नोंदणी केलीय. त्यातील तरूणांची संख्या मोठी आहे. हे सगळे स्वयंसेवक पूर्ण गणवेशात संघस्थानावर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ५०,००० नागरिक तसंच मान्यवर या कार्यक्रमात प्रेक्षक म्हणूण य़ेणार आहेत.
छत्रपती शिवरायांच्या शौर्यशाली इतिहासाचं स्मरण करत संघविचार समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. संपर्काच्या माध्यमातून कार्यविस्तार साधणं तसंच देशविघातक शक्तींना सज्जन शक्तीचं दर्शन घडवणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
शिवशक्ती संगमशी निगडीत प्रत्येक गोष्ट वैशिष्ट्य पूर्ण आहे. व्यासपीठावर सर्वोच्च स्थानी विराजमान शिवरायांचा पुतळा, व्यासपीठाची रचना, हिंदू संस्कृती तसेच संघकार्याचा आढावा घेणारी प्रदर्शनी, शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती, पर्यावरणपूरकतेचा आग्रह, तंत्रज्ञानाचा वापर अशा कित्येक गोष्टी लक्ष वेधून घेणार आहेत.