पुणे : रिक्षावाला... तोही पुण्यातला... म्हणजे मूर्तीमंत विक्षिप्तपणा असं खुद्द पुणेकरच म्हणतात. मात्र पुणेकरांच्या या दाव्याला छेद देण्याची अभिमानास्पद कामगिरी एका रिक्षावाल्याने केलीय. रिक्षात विसरलेले 32 मोबाईल या रिक्षाचालकाने पोलिसांकडे सुपूर्त केले. त्याही पुढे जात त्याच्या या कामगिरीबद्दल पोलिसांनी दिलेली बक्षिसाची रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलीय.
अंबाजी सुर्यवंशी हे पुण्यातले एक सामान्य रिक्षाचालक. पण अंबाजी आता पुण्यातल्या रिक्षाचालकांसाठी आदर्श ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिक्षात रात्रीच्या वेळी तीन प्रवासी बसले. अंबाजी यांनी त्यांना स्वारगेट स्टँडला सोडलं. दुस-या दिवशी रिक्षा साफ करताना त्यांना रिक्षाच्या मागे एक बॅग मिळाली. बॅग उघडली असता त्या बॅगेत तब्बल 32 मोबाईल होते. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी थेट पोलिसांकडेच दिले.
अंबाजींचा हा प्रामाणिकपणा चांगलाच उपयोगी आला. हे 32 मोबाईल चोरीचे असल्याचं उघड झालं. त्यामुळे पोलिसांना मुद्देमाल आयता हातात सापडला. पोलिसांनी अंबाजी यांना प्रामाणिकपणाबद्दल बक्षिस देऊन गौरव केला. पण अंबाजी यांनी ही रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतलाय.
रोजच्या रिक्षावर अंबाजी यांची उपजीविका अवलंबून आहे. पण आयत्या मिळालेल्या या 32 मोबाईलचा त्यांना मोह पडला नाही. प्रामाणिकपणाचं एक उत्तम उदाहरण त्यांनी दाखवलंय.