कोल्हापूर/चंद्रपूर : कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. तर दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघिण आढळली.
काल सकाळी पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. बिबट्याला जंगलात सोडायला जात असताना बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या घराच्या परिसरात काल सकाळी बिबट्या शिरला होता. त्यामुळं एकच गोंधळ उडाला.
स्थानिकांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. वन विभागाचे अधिकारी फार उशिरा घटनास्थळी पोहोचले.. एवढंच नव्हे तर चुकीच्या पद्धतीनं त्यांनी या बिबट्याला जाळ्यात पकडलं. त्याला गाडीत चढवतानाही अतिशय वाईट पद्धतीनं हाताळण्यात आलं होतं.
वन विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी योग्य यंत्रणा नसणं, त्याला बेशुद्ध करण्यासाठी साहित्य नसणं ही वनविभागाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यातच आता या बिबट्याचा मृत्यू झाल्यानं वनखात्याच्या ढिसाळ कारभारावर शिक्कामोर्तब झालंय.
तर दुसरीकडे नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघिण आढळली. जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील ताडोबा बफर क्षेत्रात असलेल्या मुधोली-काटवल या गावाच्या रस्त्यावर किनगाव-बोडी येथे ३ वर्षे वयाची ही वाघीण रस्त्यालगत मृतावस्थेत आढळली आहे.
वाघिणीच्या नाकातून रक्तस्त्राव दिसत असून तोंडातून फेस आलेला दिसत आहे. या वाघिणीचा मृतदेह फुगला आहे. या उमद्या जनावराची विषबाधा करत शिकार केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ या एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात ३ वाघांचे मृत्यू नोंदविले गेले आहेत. तर २०१५ च्या पहिल्याच दिवशी पट्टेदार वाघिणीचा संशयास्पद मृत्यू वनविभागाची झोप उडवून गेला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.