‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’

पुण्यातील इनामदार हॉस्पिटलला बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलीय. हॉस्पिटलच्या इमारतीचे पाच अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश महापालिकेनं बजावले आहेत. मात्र, हे अनधिकृत बांधकाम होत असताना महापालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. 

Updated: Jul 3, 2014, 08:36 PM IST
‘इनामदार हॉस्पीटल’ बनलंय पुण्याचा ‘कॅम्पा कोला’ title=

पुणे : पुण्यातील इनामदार हॉस्पिटलला बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आलीय. हॉस्पिटलच्या इमारतीचे पाच अनधिकृत मजले पाडण्याचे आदेश महापालिकेनं बजावले आहेत. मात्र, हे अनधिकृत बांधकाम होत असताना महापालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे. 

वानवडी परिसरातील इनामदार हॉस्पिटल… तब्बल १२ मजल्यांची टोलेजंग इमारत… इनामदार हॉस्पिटलची ही इमारत वादात सापडलीय. या इमारतीचे वरचे पाच मजले महापालिकेनं बेकायदेशीर ठरवले आहेत. महापालिकेची परवानगी न घेता हे पाच मजले  चढवण्यात आले आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये हे उघड झालंय. 

महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या जागेवर हॉस्पिटलचं आरक्षण आहे. त्यामुळे याठिकाणी जागा मालकाने कुठलेही बांधकाम केल्यास त्यातील विशिष्ट क्षेत्रफळाचं बांधकाम महापालिकेला हस्तांतरित करणं बंधनकारक आहे. इनामदार हॉस्पिटलने महापालिकेला जागा हस्तांतरित केलेली नाही. महापालिका सभासदांच्या तक्रारीनंतर या प्रकाराची चौकशी झाली आणि त्यात बेकायदा बांधकामाचे प्रकरण समोर आलं. 

इनामदार हॉस्पिटलच्या ट्रस्टनं हे दोन्ही आरोप फेटाळले आहेत. विकास आराखड्यातील बांधकाम नियमावली अन्यायकारक असल्याचं त्यांनी म्हटलंय. व्यावसायिक स्पर्धा किंवा इतर कुठल्यातरी कारणानं हॉस्पिटल विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याचा संशय क्रिसेंट इंडिया मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी व्यक्त केलाय.  

बांधकाम नियमावलीच उल्लंघन किंवा बेकायदा बांधकाम ही गोष्ट पुण्यात नवीन नाही. महापलिकेच्या नाकावर टिच्चून अशी हजारो बांधकामं शहरात उभी आहेत आणि अशा बांधकामांना नोटीसा बजावण्यापलीकडे महापलिका काहीच करत नाही. इनामदार हॉस्पिटल प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई होईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.