विशाल करोळे, औरंगाबाद : परदेशात मोठ्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष देत प्रत्येकी पन्नास हजार रुपये उकळूत ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीनं औरंगाबादेत सुमारे शंभर बेरोजगारांची फसवणूक केलीय. फसवणुकीचा आकडा पन्नास लाखांवर असून याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात संचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद झालीय.
'तेलही गेले आणि तुपही गेले' या म्हणीचा अनुभव औरंगाबादचे रहिवासी असलेल्या या विजय शर्मांना आलाय. परदेशात नोकरी करण्याचं त्यांचं स्वप्न तर साकार झालंच नाही उलट ५० हजार रुपयांचा फटका त्यांना बसलाय. परदेशात नोकरी देण्याचं स्वप्न दाखवून 'ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट' या कंपनीनं विजय शर्मांना गंडवलंय. अत्यंत निय़ोजित पद्धतीनं या कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप फसवल्या गेलेल्या लोकांनी केलाय. ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट कंपनीनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. कॅनडा, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सारख्या देशात स्टोअर मॅनेजर, प्लंबर, वेटर, हाऊसकिपिंग या पदांसाठी उमेदवार हवे असल्याचं त्या जाहिरातीत नमूद करण्यात आलं होतं. परदेशात लाख रुपये महिन्यांची नोकरीची संधी मिळेल या आशेनं विजय शर्मांसारख्या अऩेकांनी या कंपनीशी संपर्क केला. मात्र, कागदपत्रांच्या पूर्ततेच्या नावाखाली या कंपनीने नोकरीसाठी आलेल्या लोकांकडून हजारो रुपये उकळले.
अनेकांनी व्हिजा, विमानाचं तिकीट, वैद्यकीय चाचण्या यासाठी ५० हजार रुपये कंपनीकडे जमा केले. काहींना ऑफर लेटर आलीही... पण प्रत्यक्षात नोकरी किंवा परदेशी वारी यापैंकी काहीच हाती आलं नाही. मोहम्मद असीफ, दीपक बोराड हेदेखील त्यापैंकीच एक... ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट या कंपनीने आपली फसवणूक केल्याचं लक्षात आल्यावर पीडितांनी पोलिसात घेतली.
ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट कंपनीसाठी फसवणूक झालेल्या तरुणांनी अंधेरीतल्या एका बँकेत पैसे भरले होते या पार्श्वभूमीवर अंधेरी पोलिसांतही तक्रार दाखल करण्यात आलीय. अशा प्रकारे सुमारे ८०० लोकांना 'ग्लोबल कॉर्पोरेट मॅनेजमेंट'नं फसवल्याचं आता पुढे आलंय. त्यामुळे यापुढे नोकरीच्या जाहिरातविश्वास ठेवताना जरा जपून, असा सल्ला पोलिसांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.