ठाणे : शास्त्रीय संगितांची आवड असणाऱ्या रसिकश्रोत्यांसाठी खुशखबर आहे. शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जोपासणाऱ्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा नजराणा यावर्षी २१ नोव्हेंबर, २०१५ पासून अनुभवायला मिळणार आहे.
प्रख्यात तबलावादक पं. अनिंदो चटर्जी, सरोदवादक पार्थो सारथी यांच्यासह दिग्गज कलाकारांची मांदियाळी हे या महोत्सवाचं आकर्षण आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या महोत्सवाला जरूर हजेरी लावावी, असं आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष - महापौर संजय भाऊराव मोरे यांनी रसिक श्रोत्यांना केलंय.
या संगीत स्मृती समारोहाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या संगीत समारोहासाठी प्रवेश विनामुल्य असून प्रवेशिका गडकरी रंगायतन येथे दिनांक १९ नोव्हेंबर, २०१५ पासून उपलब्ध होणार आहेत.
दिवस पहिला - २१ नोव्हेंबर
संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात रात्रौ ८.३० वाजता नुपूर काशिद-गाडगीळ यांच्या गायनाने होणार आहे, तर प्रसिध्द शास्त्रीय गायिका पद्मश्री सुमित्रा गुहा (दिल्ली) यांच्या गायनाने समारोप होणार आहे.
दिवस दुसरा - २२ नोव्हेंबर
दिनांक २२ नोव्हेंबर, २०१५ रोजी ५.०० वाजता समीर अभ्यंकर यांचे गायन ठेवण्यात आले आहे, तर त्यानंतर काश्मिरा त्रिवेदी (ठाणे) या भरतनाटयम बॅले सादर करणार आहेत. या सत्राचा समारोप प्रसिध्द कथ्थक नृत्यांगना अर्चना संजय यांच्या कथ्थक नृत्याने होणार आहे. या दिवशीच्या रात्रीच्या सत्रामध्ये प्रसिध्द व्हायोलिनवादक मिलिंद रायकर आणि या सत्राचा समारोप प्रसिध्द गायक पं. राम देशपांडे यांच्या गायनाने होणार आहे.
दिवस तिसरा - २३ नोव्हेंबर
सोमवार दिनांक २३ नोव्हेंबर, २०१५ रोजी रात्रौ ८.३० वाजता प्रसन्न गुड यांच्या गायनाने रात्रीच्या सत्राची सुरुवात होणार आहे तर आंतरराष्ट्रीय किर्तीचे तबलावादक पं. अनिंदो चटर्जी (कोलकता) यांच्या तबलावादनाने या सत्राचा समारोप होणार आहे. त्यांना साथ करणार आहेत त्यांचे पुत्र आणि प्रसिध्द तबलावादक अनुब्रत चटर्जी.
दिवस चौथा - २४ नोव्हेंबर
मंगळवार दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५ रोजी रात्रौ ८.३० वाजता स्व.भालचंद्र तथा अण्णा पेंढारकर यांना समर्पित संवाद निर्मित 'सप्तसूर झंकारीत बोले' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संकल्पना ज्ञानेश पेंढारकर यांची असून निवेदन नरेंद्र बेडेकर यांचे आहे. यामध्ये गायिका निलाक्षी पेंढारकर, पं.सुरेश बापट, श्रीरंग भावे, वेदश्री ओक, ज्ञानेश पेंढारकर आणि पं.रामदास कामत हे कलाकार सहभागी होणार आहेत.
दिवस पाचवा - २५ नोव्हेंबर
बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर, २०१५ या संगीत समारोहाचा समारोप होणार असून या दिवशी दुपारच्या सत्रात ४.०० वाजता अखिल भारतीय नाटय परिषद, ठाणे आयोजित आणि भरतनाटय संशोधन मंदीराच्या सहकार्याने 'कटयार काळजात घुसली' हे संगीत नाटक सादर केले जाणार आहे. यामध्ये चारुदत्त आफळे, संजय मेहेंदळे, अस्मिता चिंचाळकर, रवींद्र खरे आदी कलाकार सहभागी होणार आहेत. रात्रीच्या सत्रात पं. राम मराठे स्मृती पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्यानंतर भाग्यश्री पांचाळे (मुंबई) यांचे गायन होणार असून समारेाप प्रसिध्द सरोद वादक पं. पार्थो सारथी यांच्या सरोद वादनाने होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.