पिंपरी-चिंचवड : अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात येत असलेल्या नव्या पदनिर्मितीच्या १३५ जागांसाठी तब्बल २२ हजार १९७ अर्ज ऑनलाईन पध्दतीने प्रशासनाकडे आले आहेत. तर फक्त कनिष्ठ अभियंत्याच्या ५० जागांसाठी १६ हजार २४९ अर्ज आले आहेत. या २२ हजार १९७ उमेदवारांपैकी फक्त १३५ जण लेखी परिक्षेमधून पात्र ठरविले जाणार आहेत.
शहरात ६६ हजारांहून अधिक बांधकामे असून ते पाडण्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असल्याचे महापालिकेने न्यायालयात सांगितले. त्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी नवीन १५५ पदांची निर्मिती करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, या पदनिर्मितीला मराठा, मुस्लीम आरक्षणामुळे ब्रेक लागला होता. त्यावर महापालिका प्रशासनाने तोडगा काढून आरक्षणाच्या २१ टक्के जागा वगळून उर्वरित जागांसाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे सध्या १५५ पदांपैकी १३५ पदे भरण्यात येत आहेत.
त्यामध्ये महापालिकेने कनिष्ठ अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यक आणि सर्व्हेअर अशा तीन पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यामध्ये कनिष्ट अभियंत्याची ५० जागांसाठी सर्वाधिक जास्त १६ हजार २४९ अर्ज महापालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तर अभियांत्रिकी सहाय्यक पदाच्या ८३ जागांसाठी ५ हजार ७९१ आणि सर्व्हेअरच्या दोन जागांसाठी १५७ अर्ज महापालिका प्रशासनाकडे ऑनलाईन पध्दतीने आले आहेत.
अर्ज करणा-या उमेदवारांची दोनशे गुणांची लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. सध्या बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. तर त्यानंतर दहावीच्या परिक्षा आहेत. त्यामुळे या दोन्ही परिक्ष संपल्यानंतर ही लेखी परिक्षा होईल. त्यानंतर गुणांवरून उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात येणार आहे. मात्र, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अर्ज आल्याने गुणवत्तेनुसार भरती प्रक्रिया होईल की नाही, याबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.