रेल्वे स्टेशनवरच्या अनाऊन्समेंटमुळे झाली अपहरणकर्त्याला अटक

पाच वर्षांचा चिमुकला घराबाहेर खेळता खेळता अचानक गायब झाला. शोधाशोध करुन पोलिसांकडे मध्यरात्री तक्रार केली. छोट्या कृष्णाचं अपहरण करुन त्या आरोपीनं चंद्रपूर केव्हाच सोडलं होतं. पण तेवढ्यात रेल्वेची एक अनाऊन्समेंट झाली... आणि सगळं बिंग फुटलं.

Updated: Sep 7, 2016, 10:20 PM IST
रेल्वे स्टेशनवरच्या अनाऊन्समेंटमुळे झाली अपहरणकर्त्याला अटक  title=

आशिष अंबाडे, चंद्रपूर : पाच वर्षांचा चिमुकला घराबाहेर खेळता खेळता अचानक गायब झाला. शोधाशोध करुन पोलिसांकडे मध्यरात्री तक्रार केली. छोट्या कृष्णाचं अपहरण करुन त्या आरोपीनं चंद्रपूर केव्हाच सोडलं होतं. पण तेवढ्यात रेल्वेची एक अनाऊन्समेंट झाली... आणि सगळं बिंग फुटलं.

४ सप्टेंबरच्या संध्याकाळी ५ वर्षांचा कृष्णा घराबाहेर खेळता खेळता अचानक गायब झाला. रात्री अडीच वाजता कृष्णाच्या कुटुंबीयांनी रडत रडत पोलीस स्टेशन गाठलं.

याच परिसरातल्या रवी नावाच्या तरुणाबरोबर कृष्णाला जाताना पाहिल्याची पहिली टीप पोलिसांना मिळाली. मग आरोपीच्या अख्ख्या कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये आणलं. आरोपीच्या काकाचा फोन खणखणला... कृष्णाला घेऊन पळालेल्या रवीचाच तो फोन होता.

काका हळू आवाजात बोलतोय, त्यामुळे रवीला संशय आला आणि त्यानं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आपण चेन्नईला जात असल्याचं सांगितलं. पण तेवढ्यात 'नरखेड रेल्वे स्टेशन पर आपक स्वागत है' अशी उद्घोषणा त्या फोनमधून ऐकायला  आली.... आणि तातडीनं चक्रं फिरली. 

कृष्णाचे फोटो 'आरपीएफ'ला व्हॉटसअप करण्यात आले आणि अख्खा फोर्स कामाला लागला. मध्यप्रदेशातल्या 'आमला' रेल्वे स्टेशनवर आरोपी रवी केशकर आरपीएफच्या जाळ्यात अडकला. बल्लारूपर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांनी ही माहिती दिलीय.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी यंत्रणांवर कमालीचा ताण होता, तरीही  यंत्रणेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण यानिमित्तानं समोर आलं. छोटा कृष्णा त्याच्या यशोदेला परत मिळाला... आणि बल्लारपूरमधल्या त्याच्या छोट्याशा घरात आनंदी आनंद झाला.