बदलापूर/ठाणे : मुंबईच्या घामट दगदगीतून निवांत क्षण अनुभवण्यासाठी आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईपासून हाकेच्या अंतरावरच आहे कोंडेश्वर... सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेला कोंडेश्वरचा फेसाळणारा धबधबा येणा-या जाणा-याचं लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही.
बदलापूर -कर्जत मुख्य महामार्गावर खरवई गावात येताच कोंडेश्वरकडे जाणारा एक मार्ग लागतो. दहिवली गावाची वेस ओलांडली की समोरं दिसतं थक्क करणारं, डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारं दृश्य.
डोंगर कपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवीगार भातशेतीची खाचरं, रिमझिमणारा पाऊस आणि दुस-या बाजुला ताठ मानेनं डौलत उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग. सारं काही मनाचा, शरिराचा थकवा घालवणारं असंच.
सुरूवातीला तुम्हाला लागतं भोज धरण, या धरणातून वाहणा-या पाण्यावर एक बंधारा बांधण्यात आलाय. त्यामुळं कोंडेश्वरला जाण्याआधी पर्यटकांची पावलं आधी या भोज धरणाकडेच वळतात.
कोंडेश्वरमधलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्राचिन शिवमंदिर.. महाशिवरात्रीला इथे भाविकांची गर्दी असते. इथल्या कुंडाचं पाणी अतिशय खोल आहे. त्याबाबतचे फलकही इथे लावलेत. शहरातली गर्दी आणि कलकलाटापासून नेहमीच्याच पर्यटनस्थळापेक्षा वेगळं ठिकाण हवं असेल तर मग कोंडेश्वरला नक्की भेट द्याच.