रत्नागिरी: भाजपच्या बरोबरीनं शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि त्यातून कोकणाच्या वाट्याला मंत्रिपद येईल अशी आशा कोकणातल्या इच्छुक आमदारांना होती. मात्र विरोधी बाकावर बसण्याच्या निर्णयानं कोकणातल्या दिग्गज नेत्यांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरलं गेलंय. तसंच शिवसेना-भाजपच्या उडालेल्या खटक्यांचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतील असं चित्र आहे.
निवडणुकीआधी नाही तर निवडणुकीनंतरतरी युती होईल आणि मंत्रिपद पदरात पडेल, अशी आशा शिवसेनेच्या आमदारांना होती. त्यासाठी सगळ्यांनी फिल्डिंग लावली होती. उदय सामंत आणि दीपक केसरकरांना मंत्रिपदासाठी सर्वाधिक संधी होती. मात्र भाजपनं आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि शिवसेनेला विरोधी बाकांवर बसावलं लागलं. त्यामुळं कोकणाच्या वाट्याला मंत्रिपदच आलं नाही. तसंच भविष्यातही शिवसेना भाजपबरोबर जाईल अशी परिस्थिती दिसत नाही.
राज्य पातळीवर युतीतल्या खटक्याचे पडसाद कोकणात स्थानिक पातळीवरही पहायला मिळतायेत. रत्नागिरीत उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीची मदत घेतली. त्यानंतर आता भाजप नगराध्यक्षपद सोडायला तयार नाही. तसंच रत्नागिरी जिल्हा परिषदेतही शिवसेना-भाजपमध्ये कुरबुरी सुरू झाल्यायत. शिवसेना-युतीच्या या कुरबुरीत कोकणाच्या विकासाला खीळ बसू शकतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.