धक्कादायक, सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले

कर्ज परतफेड केल्यानंतरही सावकाराने अधिकच्या पैशासाठी  बळजबरीने एका शेतकऱ्यास चक्क विष पाजल्याची  धक्कादायक घटना बीडच्या मानेवाडी येथे घडलीय. 

Updated: Jan 21, 2016, 07:44 PM IST
धक्कादायक, सावकाराने शेतकऱ्याला विष पाजले title=

बीड : कर्ज परतफेड केल्यानंतरही सावकाराने अधिकच्या पैशासाठी  बळजबरीने एका शेतकऱ्यास चक्क विष पाजल्याची  धक्कादायक घटना बीडच्या मानेवाडी येथे घडलीय. 

मानेवाडी येथील भरत उत्तरेश्वर माने हे पोलीस पाटील असून, शेतीही करतात. पाच वर्षांपूर्वी माने यांनी अप्पासाहेब मुंडे आणि सूर्यभान मुंडे यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी पाच लाख रुपये घेतले. माने यांनी हळूहळू कर्जाची रक्कमही फेडली. तरीही मुंडेकडून आणखी पाच लाख रुपयांची मागणी होत होती.

पैसे देत नसल्याच्या कारणावरून अप्पासाहेब मुंडे आणि सूर्यभान मुंडे यांच्याबरोबर अन्य दोघांनी त्यांना मानेवाडी शिवारातील हनुमंत रामहरी माने यांच्या शेतामध्ये १३ जानेवारी रोजी हात-पाय धरून बळजबरीने विष पाजलं आणि धूम ठोकली.

घटनेनंतर मानेंना बीडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.