नांदेड : हुंडयासाठी पैसे नसल्यामुळे बहिणीची सोयरिक मोडल्याचा ताण सहन न झाल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केलीय. सतिश कदम असं या तरुणाचा नाव आहे.
हिमायतनगर तालुक्यात डोलारी गावामधली ही घटना आहे. गेल्या वर्षी सतिशच्या बहिणीचं सिरपल्ली येथील तरुणाशी लग्न ठरलं होतं.
लग्नाची तारीख ठरवण्यासाठी सतीश आणि त्याचे वडील माधव कदम मुलाच्या घरी गेले. मात्र, यावेळी मुलींच्या वडिलांकडे दोन लाखाच्या आगाऊ रक्कमेची मागणी करण्यात आली.
दुष्काळामुळे नापिकीनं हैराण झालेले असताना आगाऊ हुंड्याच्या विवंचनेत कुटुंब सापडलं. हुंडा देता येणं शक्य नसल्यामुळे सोयरिक मोडली.
हे दुख सहन न झालेल्या सतीशनं गावातल्या सार्वजिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.