मुंबई : वादग्रस्त कार्टुन छापल्याप्रकरणी महाराष्ट्रातील विविध भागातील लोकमत समूहाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तसेच लोकमतच्या प्रती महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाळण्यात आल्याचाही प्रकार घडला.
लोकमत' वृत्तपत्राच्या मंथन पुरवणीत इसीसचा पैसा असा लेख लिहिण्यात आला. त्या लेखात वादग्रस्त कार्टुनचा उपयोग ग्राफीक्स डिझायनरने केला. पण त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या असे म्हणत हजारोंच्या संख्येने मुस्लिमांनी धुळे, नंदुरबार, मालेगाव आणि महाराष्ट्रातील विविध भागात निषेध व्यक्त केला.
या संदर्भात कार्टुनिस्ट आणि वर्तमानपत्राच्या संपादकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी लोकमतच्या संपादकांनी आपल्या सर्व आवृत्यांमध्ये खुलासा छापून झाल्या प्रकाराची माफी मागितली आहे. तसेच मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावण्याचा उद्देश नसल्याचे म्हटले आहे.
लोकमतचा खुलासा
लोकमत रविवार मंथन पुरवणीच्या २९ नोव्हेंबरच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेल्या ‘इसिसचा पैसा’ या लेखासोबत ग्राफिक डिझाईनमध्ये वापरल्या गेलेल्या अरबी शब्दांमुळे तमाम मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकमत या गंभीर चुकीबद्दल दु:खी असून, त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. केवळ अनवधानाने ही चूक झाली असून, कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा लोकमतचा हेतू कधीही नव्हता आणि नसेल. लोकमतने नेहमी सर्वधर्म समभाव यावर विश्वास ठेवला आहे. झालेल्या चुकीसाठी जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करण्यात आलेली आहे.
लोकमतची सुरक्षा वाढवली
दरम्यान, भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्रातील विविध लोकमत कार्यालयांबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
आम्ही सर्व गोष्टीवर लक्ष ठेऊन आहोत. नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे, असे महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.