नंदुरबार : श्रीमंतांच्या घरचे विवाहसोहळे कायम चर्चेचा विषय ठरत असतात. पण नंदुबारमधला एक विवाह सोहळाही सध्या चर्चेत आहे. कारण या विवाहसोहळ्यात 34 उपवर वधुंनी लग्नगाठ बांधली आणि हा सोहळा पर पडला केवळ 1 रुपयात.
नेतेमंडळींच्या मुलांचे शाही विवाहसोहळे कायम चर्चेचा विषय ठरतात. पण ग्रामीण भागातल्या विवाह सोहळ्यांमुळे कष्टकरी कुटुंब कर्जबाजारी होतात. शिवाय समाजातल्या इतर अनिष्ठ प्रथाही आहेतच.
या प्रथा मोडीत काढण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या वतीनं नंदुरबारमध्ये सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. विशेष म्हणजे हा 34 उपवर वधुंचा विवाह सोहळा अवघ्या एका रुपयात पार पडला.
उच्चशिक्षित मुलगा म्हटलं की लग्नातला थाटमाटही तेवढाच. पण या सामूहिक विवाहसोहळ्यात हा सारा थाटमाट बाजूला ठेवून कित्येक उच्चशिक्षित मुलामुलींनी लग्नगाठ बांधली. मानापमानाला या सोहळ्यात थाराच नव्हता. 1 रुपयात पार पडलेला हा सामूहिक विवाह सोहळा म्हणजे अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाराच म्हणावा लागेल.