नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनसेच्या डझनभर उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाल्यान मनसेत धुसफुस सुरु झालीय. भविष्यात मनसेत मोठी फुट अटळ असून अनेक जण भाजपा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. नाराजी अधिकच वाढल्याने दिवाळी संपताच नाशिक महानगरपालिकेत धमाके होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक शहर मनसेचा बालेकिल्ला...२००९ मधील विधानसभा निवडणुकीत तीन आमदार देत नाशिककर जनतेने राज ठाकरे यांच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकले. सर्वच राजकीय पक्षांनी कामे न करता नुसती पोकळ आश्वासनं दिल्यानं राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटची भुरळ नाशिककरांना इतकी पडली की महापालिका निवडणुकीत मनसेचे चाळीस नगरसेवक निवडून आले. मात्र गेल्या पाच वर्षात जनतेच्या अपेक्षेप्रमाणे कामे झाले नाही. परप्रांतीयांचा आकांडतांडव केवळ माध्यमांपुरता राहीला. टोलचा मुद्दाही पूर्णपणे धसास लावला गेला नाही. विधानसभेत पक्षाकडून जनतेचे प्रश्न मांडले गेले नाहीत. लोकप्रतिनिधींकडून ठोस कामे झाले नाहीत. केवळ बांधकाम व्यावसायीकांच्या दावणीला बांधलेल्या पदाधिका-यांना कार्यकर्त्यांनी ओळखले आणि या विधानसभेत सर्वांनाच जागा दाखविली. वसंत गिते वगळता सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालंय. धीर खचलेले मनसेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत.
महापालिकेत मनसेच्या चाळीस नगरसेवकांचा गट आहे. पक्षाची प्रतिमा इतकी खालावली आहे की यातल्या अनेकांना पक्षात राहून पुन्हा निवडून येण्याची शाश्वती राहिलेली नाही. एक तृतीयांश नगरसेवक फुटल्यास मनसेला फटका बसू शकतो. तर फायदा भाजपला मिळू शकतो. दिवाळी संपताच राजीनामा देण्याचे फटाके फुटतील असा अंदाज व्यक्त होतोय.
सर्वच पक्षात भूकंप होण्याच्या स्थितीत असून भाजपला राजकीय बाजारात चांगलीच तेजी दिसून येते आहे. महामंडळ अध्यक्षपद अशा आश्वासनावर प्रत्येक जण गळ टाकून आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.