रत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार?

रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. नाराज असलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिलीय तर रमेश कदम यांनी जाधवांवर तोफ डागलीय. दुसरीकडे दोघांच्या भांडणात राजकीय लोणी खाण्यासाठी भाजपा टपून बसल्याचीही चर्चा आहे. 

Updated: Oct 27, 2016, 09:11 PM IST
रत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार? title=

प्रणव पोळेकर, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. नाराज असलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिलीय तर रमेश कदम यांनी जाधवांवर तोफ डागलीय. दुसरीकडे दोघांच्या भांडणात राजकीय लोणी खाण्यासाठी भाजपा टपून बसल्याचीही चर्चा आहे. 
 
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलबेल आहे, असं चित्र निर्माण केलं गेलं होतं. मात्र, नगर पालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वानं माजी आमदार रमेश कदमांना सर्वाधिकार बहाल केले आणि पक्षातली खदखद बाहेर आली. चिपळूणमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी समर्थकांसमोर आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली.

जाधव पक्षात आल्यापासूनच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम  रत्नागिरीचे उदय सामंत यांचा गट जाधवांच्या विरोधात कार्यरत राहिला... जाधवांना जिल्ह्यातल्या बड्या नेत्यांशी दोन हात करताना कार्यकर्त्यांची मात्र चांगली साथ लाभली... 

प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी जाधवांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सांगितलं असलं तरी रमेश कदमांनी मात्र जाधवांवर तोफ डागलीये. जाधव खोटं बोलत असल्याचा आरोप करत त्यांनीच जिल्ह्यात पक्षाची वाट लावल्याची टीका कदमांनी केलीये. 

जिल्ह्यातला पक्षातला संघर्ष शिगेला पोहोचला असताना भास्कर जाधवांसाठी भाजपानं गळ घातल्याचं दिसतंय... भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तसे संकेतच दिलेत... 

रत्नागिरी जिल्ह्यातला हा बडा मासा भाजपाच्या गळाला लागला तर पक्षाची ताकद वाढणार आहे. मात्र, लागोपाठ दोन प्रदेशाध्यक्ष देणाऱ्या कोकणात राष्ट्रवादीला मात्र हा मोठा हादरा असेल.