पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राज्य कार्यकारिणीचं आजपासून दोन दिवसीय अधिवेशन सुरु होत आहे.
मुख्यमंत्र्यांसह भाजपचे सर्व मंत्री आणि पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत. नारायण राणेंच्या भाजपच्या प्रवेशाबद्दल सध्या जोरदार चर्चा असल्यानं सुद्धा कार्यकारिणीच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे.
राणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मिळून अहमदाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याच्या बातम्या दोन आठवड्यापूर्वी समोर आल्या. मुख्यमंत्री आणि राणे एकाच गाडीत बसून अहमदाबादमध्ये फिरतानाची दृश्यही 'झी 24 तास'नं दाखवली होती... पण ही दृश्यं लीक झाल्यामुळेच बहुदा राणेंचा भाजप प्रवेश लांबल्याचं सध्याचं चित्र आहे.
दरम्यान, भाजप मधल्याच एका गटाचा राणेंच्या प्रवेशाला तीव्र विरोध असल्याची माहितीही प्रसार माध्यमांमध्ये पुढे आली. या घडामोडींच्या पार्श्वभूमीमुळे होणाऱ्या भाजपच्या कार्यकारिणीला विशेष महत्त्व आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजप कार्यकारिणीचं अधिवेशन होत आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हापरिषद आणि पंचायात समितीच्या निवड़णूकांमध्ये भाजपला मिळालेलं यश, मंत्रीमंडळाचा विस्तार, कर्जमाफी, शिवसेनेशी असणारी युती हे मुद्दे सुद्धा चर्चेत असणार आहेत.