योगेश खरे, नाशिक : सध्या युरो कपमुळे फुटबॉलचा फिवर झोकात आहे. एका पराभवाने खचलेल्या मेसीने निवृत्ती घेतली. मात्र नाशिकमध्ये लष्करातला एक माजी सैनिक संकटावर कशी मात करायची याचं हे तर प्रात्यक्षिक...
पावसाळा, मैदानात झालेला चिखल, युरो कपची झिंग... यामुळे सध्या सर्वत्र क्रिकेटऐवजी फुटबॉलचा फिवर दिसून येतोय. भर पावसात चिखलात सामने रंगतायत. अशाच एका सामन्यात 'तो' मैदानात उतरला. विशेष म्हणजे इतर खेळाडूंसारखा तो नाही. दोन्ही पाय आणि एक हात त्याने गमावलाय. तरीही तो कमरेखालील लाकडी पायांच्या सहाय्याने जोमात फुटबॉल खेळत होता. या लढवय्याचं नाव दिपचंद. कारगिल युद्धाच्या वेळी बोफोर्स तोफेत गोळा भरताना अपघात झाला, आणि तोफगोळ्याच्या स्फोटात त्याचे दोन पाय आणि हात गेले. पण दिपचंद हरला नाही... आलेल्या आयुष्याला दिपचंद मोठ्या हिंमतीने सामोरा गेला... नुसता सामोराच गेला असं नाही तर तो असा फुटबॉल खेळून रोज हे आयुष्य साजरंही करतो.
हातपाय धडधाकट असूनही तुमच्या आमच्यातले अनेक जण निराशेच्या गर्तेत स्वतःला ढकलत असतात. त्या सर्वांनी दीपचंदकडून जगणं म्हणजे काय हे शिकायला हवं.
अपंगांनी आणि निराश झालेल्यांनी दीपचंद या लढवय्याला नक्की भेटा... जगण्याची उमेद निश्चित मिळेल. एका पराभवाने खचलेल्या मेसीने घेतलेल्या निवृत्तीची चर्चा आपल्याकडे खुप झाली. पण आमच्या या बहाद्दर दीपचंदची कथा अक्षरशः मेसीनेही पाहावी अशीच...