मनमाड: कांद्याला सध्या सोन्याचा भाव आलाय. त्यामुळंच की काय, आता चोरांनीही आपला मोर्चा कांद्याकडं वळवलाय... नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड इथं सुमारे 1 लाख रूपयांच्या कांद्याची चोरी झालीय.
आबा पवार नावाच्या शेतकऱ्यानं दुष्काळावर मात करत, कसाबसा कांदा पिकवला. कांद्याला चांगला भाव आल्यानंतर तो विकू, या आशेनं त्यांनी तब्बल 40 क्विंटल कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला होता. मात्र या शेतकऱ्याचं दुर्दैव असं की, रविवारी रात्रीच चोरट्यांनी तब्बल 18 ते 20 क्विंटल कांदा चोरला. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आलाय. गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यात कांदा चोरीची ही तिसरी घटना असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
जैन धर्मिय व्यापाऱ्यांचा बाजार समिती बंद
दरम्यान नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज दुष्काळात तेरावा महिना अनुभवला. जैन समाजाच्या संथारा पद्धतीवर राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी घातलीय. त्याला विरोध म्हणून जैन धर्मिय व्यापाऱ्यांनी बाजार समितीत व्यापार बंद केला. व्यापा-यांच्या या बंदमुळे कांदा उलाढाल ठप्प झाली.
तर कांद्याची पूड वापरा - हरसिमरत कौर
कांद्याच्या दरवाढीवर इलाज म्हणून कांद्याची पूड वापरण्याचा सल्ला अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांनी दिलाय. कांद्याचे भाव कमी असतानाच त्याची पेस्ट अथवा कांद्याची पूड करुन अन्न प्रक्रिया तंत्रज्ञानाने साठवून ठेवावी, ज्यावेळी भाव वाढतील त्यावेळी ते वापरावे असा सल्ला अन्नप्रक्रिया मंत्र्यांनी दिलाय.
कांद्याचे भाव वाढल्यानं निर्यात भावात वाढ आणि 10 हजार टन कांदा आयात या प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्यात. अन्न प्रक्रिया मंत्रालय लहान फूड पार्क तयार करीत आहे, यासाठीस सरकार 1 कोटींचं अनुदान देणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.