काशीकापडी जात-पंचायतीच्या 'त्या' नऊ पंचांना अटक

नाशिकमधल्या काशी कापडी समाजातील महिलेवर अनिष्ट प्रथा लादल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी काशी कापडी जातपंचायतीच्या नऊ पंचांना अटक केलीय. 'झी २४ तास'ने सर्वप्रथम हे वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

Updated: Jan 6, 2016, 12:58 PM IST
काशीकापडी जात-पंचायतीच्या 'त्या' नऊ पंचांना अटक title=

येवला : नाशिकमधल्या काशी कापडी समाजातील महिलेवर अनिष्ट प्रथा लादल्याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिसांनी काशी कापडी जातपंचायतीच्या नऊ पंचांना अटक केलीय. 'झी २४ तास'ने सर्वप्रथम हे वृत्त प्रसारित केलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

पुण्याच्या खडक पोलिसांनी ही कारवाई केलीय. काशी कापडी समाजातील जातपंचायतीच्या पंचावर आता गजाआड होण्याची वेळ आलीय आणि त्याला कारणही तसंच आहे. समाजाला जुन्या अनिष्ट रुढींना केवळ खतपाणी घालण्याचं काम यांनी केलं नाही तर त्या अनिष्ठ रुढी लादण्याचा गुन्हा या पंचांनी केलाय. 

पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी शोभा वाटमकर या पीडित महिलेवर या पंचांनी अनिष्ठ प्रथा पाळण्याची सक्ती केली होती. या विरोधात शोभा वाटमकर यांची मुलगी कोमल वर्देने येवला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी काशी कापडी जातपंचायतीच्या या पंचांना बेड्या ठोकल्याची माहिती पोलीस निरीक्षक विवेक मुगळकर यांनी दिलीय. 

काशी कापडी समाजातील अनिष्ठ प्रथांना वाटमकर कुटुंबीयांनी विरोध दर्शवल्यामुळे शंकर वाटमकर यांच्या बारावा आणि तेराव्याच्या विधीला समाजाचे लोक आले नसल्याचा आरोप वाटमकर कुटुंबाने केलाय. आपल्या आईवर झालेल्या अऩ्यायाविरोधात कोमलने जातपंचायती विरोधात लढा पुकारला होता. तिचा संघर्ष सर्वप्रथम 'झी २४ तास'ने जगासमोर आणला होता.

आपला लढा समाजाशी नसून समाजातील अनिष्ट प्रथाविरोधात असल्याचं कोमल आणि तिच्या कुटुंबाचं म्हणनं आहे. तसेच रुढी परंपरेच्या नावाखाली काशी कापडी समाजातील विधवांना दिली जाणारी अमाणुष वागणूक, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना बहिष्कृत करणे, असे अनिष्ट प्रकार थांबवण्याची आवश्यकता आहे.