नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे कमाल दर २०००च्या वर गेलेत. सरकारने कांदा निर्यातमुल्य ३०० डॉलरने वाढविल्यानंतरही देशांतर्गत मागणी वाढल्यानं कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होतीय.
पिंपळगावात सरासरी दरानुसार १७०० रुपये तर लासलगावला १६२५ रुपये क्विंटलने विकला गेला आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीने कांदा पिकावर उत्पादन खर्च वाढून उत्पादनात घट झाल्याने आवक मंदावली आहे. त्यातच पाऊस तोंडावर असल्याने शेतकरी कांदा बाहेर काढण्यास तयार होत नाहीये. त्यामुळे बाजारसमितीत कांदा कमी येतोय आणि कांद्याचे भाव वाढतायेत.
तर दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सज्ज असून मान्सूनची स्थिती सुधारेल असा आशावाद केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केलाय. रेंगाळलेला मान्सून आणि महागाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत मान्सूनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
हवामान खात्याने 7 जुलैनंतर चांगल्या मान्सूनची भविष्यवाणी केलीय. या बैठकीला कृषीमंत्र्यांसह, अर्थमंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.