बीड : भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर त्यांच्या कुटुंबाचाच हक्क आहे, असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अखेर विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय.
‘पंकजा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतील’ असं विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. यानंतर, पंकजा मुंडे यांनी आपण परळी विधानसभा मतदार संघातून अर्ज दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलंय. पंकजा उद्या (गुरुवारी) आपला अर्ज दाखल करतील.
गोपीनाथ यांच्या मृत्यूनंतर आमदार पंकजा मुंडे पालवे ही जागा लढवणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याचेही संकेत मिळाले होते. पण, अखेर त्यांनी विधानसभेच्या रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय.
प्रीतम मुंडे खाडे लढवणार लोकसभेची पोटनिवडणूक
तर, मुंडे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणुकीसाठी पंकजा यांची लहान बहिण आणि गोपीनाथ मुंडे यांची द्वितीय कन्या प्रीतम मुंडे खाडे अर्ज दाखल करणार आहे. प्रीतम 26 तारखेला पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. या पोटनिवडणुकीसाठी बीडमध्ये विधानसभा मतदानाच्या दिवशीच म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.
महत्ताचं म्हणजे, मुंडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी या मतदारसंघात राष्ट्रवादीचा कोणताही उमेदवार दिला जाणार नाही, असं जाहीर केलं होतं. या मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांचा पराभव केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.