बारामती: शिवसेना-भाजपमधील रोजच्या भांडणामुळं युतीच्या संसारात खटके उडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार १४ फेब्रुवारीला एकत्र येतायत. खास व्हॅलेंडाइन डेच्या मुहूर्तावर.
दिल्लीच्या निवडणूक निकालानंतर कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय... एकीकडं बेवफाईचे दर्दभरे सूर... तर दुसरीकडं नव्या भेटीची हूरहूर... एकीकडं संसारात उडणारे खटके, दुसरीकडं गुदगुल्या करणारे गुलाबी वारे... लव्ह इज इन द एअर, एव्हरीव्हेअर... मग पॉलिटिकल फ्रंट देखील त्याला अपवाद कशी असेल? होय, आम्ही बोलतोय ते एकमेकांचे विरोधक असलेल्या दोघा दिग्गज नेत्यांबद्दल... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीबद्दल... विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पराभवासाठी मोदींनी बारामतीत सभा घेतली होती. आता तेच मोदी पुन्हा बारामतीत परततायत ते शरद पवारांच्या निमंत्रणावरून... नेमका १४ फेब्रुवारीचा व्हॅलेंटाइन डेचा मुहूर्त त्यासाठी काढण्यात आलाय. त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्यायत... भाजपकडून या भेटीचं उघड समर्थन केलं जातंय...
पंतप्रधान मोदींचे बारामतीत भरगच्च कार्यक्रम आहेत. विशेष म्हणजे ते शरद पवारांच्या घरी स्नेहभोजन देखील घेणार आहेत. यामध्ये कोणतंही राजकारण नसल्याचं राष्ट्रवादीकडूनही स्पष्ट केलं जातंय.
एकीकडे भाजप आणि शिवसेनेतले संबंध दिवसागणिक बिघडत चाललेत. तर दुसरीकडं भाजपला पाठिंबा देण्याची तयारी दाखवणाऱ्या राष्ट्रवादीसोबत भाजपची जवळीक वाढत चाललीय. दोघांत तिसरा येतोय... आता या कहाणीचा क्लायमॅक्स काय होणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.