मौदा : आपल्याला २४ तास वीज हवी असेल तर वीज प्रकल्प हवेत. प्रत्येकाच्या घरात २४ तास वीज पुरविण्याचे आपले उद्दीष्ट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
नागपुरातील मौदा येथील एनटीपीसीच्या प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
विजेमुळे उद्योग येतात आणि रोजगारनिर्मिती होते त्यामुळे केंद्र सरकार आगामी काळात वीज उत्पादनावर भर देणार आहे. देशातील प्रत्येक गावात, प्रत्येक घरात २४ तास वीज पुरविण्याचे माझे लक्ष्य आहे. वीजेच्या उपलब्धतेवर प्रगतीचा वेग ठरतो त्यामुळे वीज संदर्भातील प्रकल्पांना आमच्या सरकारचे प्राधान्य असेल, असे मोदी म्हणालेत.
सावकारच्या कर्जबाजारीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, मात्र आता शेतकऱ्यांसह सर्वांसाठी जन-धन योजना लाभदायक ठरेल या योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचा एक लाख रुपयांचा विमा उतरवणार आहोत.
विजेशिवाय विकास होऊ शकत नाही. मात्र २४ तास वीज हवी, तर वीज प्रकल्पही हवेत, असं त्यांनी सांगितलं. प्रत्येकांनी आधी बॅंकेत अकाऊंट काढा, असे मोदी म्हणाले. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांचा उल्लेखही मोदींनी आपल्या भाषणात केला.
प्रधानमंत्री जनधन योजना लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्याचा सर्वाधिक फायदा शेतक-यांना होईल. प्रत्येक गरीब कुटुंबाचं बँक खातं काढण्यात येईल. त्यामुळं आत्महत्येच्या संकटातून शेतक-यांना मुक्ती मिळेल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हायला हवा, असं सांगतानाच भ्रष्टाचाराबद्दल बोलल्यानं काहींना अडचण होते, असा टोला मोदींनी लगावला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वीजमंत्री पियूष गोयल देखील यावेळी उपस्थित होते.
वीज निर्मितीसाठी प्रकल्प आवश्यक आहेत. तसेच वीज बचत ही सुद्धा काळाची गरज आहे. प्रत्येक कुटुंबाने प्रतिमहिना वीज बचतीकडे लक्ष ठेवावे असे आवाहनही मोदींनी केले. वीजबचतीची सवय लागल्यास यातून आपोआप बदल होईल, असे मोदी म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. प्रत्येक गावात लवकरच २४ तास अखंडित वीज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.