पुण्यात यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात होणार विसर्जन

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणं सज्ज झालंय. विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्य़ात आलीय. पुण्यात नदीत पाणी सोडलं जाणार असलं तरी कृत्रिम तलावांत विसर्जनाकडे भक्तांचा कल दिसतोय. मानाच्या गणपतींचंही तलावांतच विसर्जन होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

Updated: Sep 15, 2016, 09:45 AM IST
पुण्यात यंदाही मानाच्या गणपतींचं हौदात होणार विसर्जन  title=

अरुण मेहेत्रे, पुणे : विसर्जन मिरवणुकीसाठी पुणं सज्ज झालंय. विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्य़ात आलीय. पुण्यात नदीत पाणी सोडलं जाणार असलं तरी कृत्रिम तलावांत विसर्जनाकडे भक्तांचा कल दिसतोय. मानाच्या गणपतींचंही तलावांतच विसर्जन होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

पर्यावरण पूरक विसर्जन 

मुंबई इतकंच महत्त्व असतं ते पुण्यातल्या गणेश विसर्जनाला... पारंपरिक पद्धतीनं निघणारी मिरवणूक, मानाचे गणपती हे इथल्या मिरवणुकीचं वैशिष्ट्यं... मात्र, ही परंपरा जपतानाच पुणेकरांनी आता पर्यावरण पूरक विसर्जनाची कासही धरलीय. 

यंदा पाऊस चांगला झाल्यानं धरणांमध्ये पाणी आहे. त्यामुळे विसर्जनासाठी मुळा-मुठेमध्ये पाणी सोडण्यात येणार असलं, तरी बाप्पाला पर्यावरण पूरक पद्धतीनं निरोप देण्याचा पुणेकरांचा प्रयत्न असणार आहे. विसर्जन नदीमध्ये न करता हौद किंवा टाक्यांमध्ये करावं, असं आवाहन महापालिकेनं केलंय. विसर्जन घाटांवर जवळजवळ ५० हौद तसेच ५० टाक्यांची व्यवस्था करण्यात आलीय. त्याशिवाय ठिकठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आलेत. 

Dhol : Stock Photo
ढोल ताशांचा गजर 

घरच्या घरी विसर्जनाकडेही कल... 

घरच्या घरी विसर्जन करायचं असेल तर अमोनिअम बायकार्बोनेट पावडरचं वाटप करण्यात येतंय. ही पावडर नागरिक स्वतःहून घरी घेऊन जात आहेत. 

मानाच्या गणपतींचं हौदामध्ये विसर्जन करण्याचा पायंडा गतवर्षी पाडला गेला. यंदाही या मंडळांसह सर्व प्रमुख मंडळं हौदात विसर्जन करणार आहेत. पुण्यात दरवर्षी सुमारे तीन लाख गणपतींचं विसर्जन होतं. गेल्या वर्षी सुमारे एक लाख मूर्तींचं पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं होतं. यंदा हा आकडा वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.