'घुंगरू घालून राज्य सरकारला नाचवू'

स्मिता पाटील यांनी डान्सबार विरोधात एल्गार पुकारत सरकारला घुगरू घालून नाचवू असा इशारा दिला आहे. स्मिता या माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची कन्या आहेत. 

Updated: Jan 11, 2016, 06:08 PM IST
'घुंगरू घालून राज्य सरकारला नाचवू' title=

अहमदनगर : स्मिता पाटील यांनी डान्सबार विरोधात एल्गार पुकारत सरकारला घुगरू घालून नाचवू असा इशारा दिला आहे. स्मिता या माजी गृहमंत्री आर आर पाटील यांची कन्या आहेत. 

आम्ही प्रथम सरकारशी चर्चा करू, या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला तर ठीक. नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि घुंगरू घालून राज्य सरकारला नाचवू असं स्मिता पाटील यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने स्मिता पाटील हिने राळेगणसिद्धी येथे जाऊन रविवारी भेट घेतली. या बैठकीला स्मिता पाटील हिच्यासह आर आर पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्यासोबत अभिजित देशमुख, पुंडलिक जंगले आणि इतर सदस्य उपस्थित होते.

आपण ज्येष्ठ आणि आदरणीय आहात. सरकारला आपल्या वतीने दोन शब्द सबुरीचे सांगितले तर सरकार ऐकेल, यासाठी मी तुमच्याकडे आली आहे. सरकार डान्स बार सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. कोर्टात आपली बाजू भक्कम मांडण्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे आदी मुद्यांवर स्मिताने अण्णांशी सविस्तर चर्चा केली.

आर आर आबांनी डान्स बार बंदीचा घेतलेला निर्णय कसा योग्य होता. सरकारने बार पुन्हा सुरु केले तर तरूण पिढी वाया जाईल याची माहिती स्मिताने अण्णांना दिली. 

आता सरकार पुन्हा डान्स बार सुरु पाहत आहे. आबांचे निधन होऊन सहा महिने होत नाहीत तोवर सरकारला ही सुबुद्धी सुचली आहे.  आबांची कन्या म्हणून मला हे न रूचणारे आहे. सरकारने आमचे ऐकले तर ठीक नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. सरकारला घुंगरू घालून नाचवणार आणि सामान्यांत जनजागृती करणार असा इशारा स्मिता पाटील यांनी दिला आहे.

राज्यात डान्स बार बंद राहावेत यासाठी मी आर आर पाटील फाऊंडेशनच्या वतीने मोहिम हाती घेतली आहे. आबांनी ऐतिहासिक निर्णय घेताना जनहित पाहिले होते. अनेक तरूणांचे आयुष्य डान्स बारमुळे बरबाद झाल्याचे आबांनी पाहिल्यामुळेच त्यांनी डान्सबारवर बंदी आणली होती, असंही यावेळी स्मिता यांनी सांगितलं.