नागपूर : तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेल्यांना भाजपने निष्कासीत केलंय. या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच आता नागपूरच्या बंडखोरांनी भाजप पक्षाला कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीत भाजपविरोधात बंडाळी करणाऱ्या 56 जणांवर भाजपने कारवाई केली. त्यांना पक्षातून निष्कासीत केलं. पण आता या आदेशाला बंडखोरांनी आव्हान दिलंय. पक्षाने निष्कासीत करण्यापूर्वीच 5 तारखेलाच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा दावा बंडखोर उमेदवार श्रीपाद रिसालदार यांनी केलाय. त्यामुळे त्यानंतर निष्कासीत केल्याची आवई फिरवून पक्षाने आपली बदनामी केल्याचा रिसालदार यांचा आरोप आहे.
राजीनामा दिला असेल तर रिसालदारांनी राजीनाम्याची प्रत दाखवावी असं आव्हान भाजप शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिले आहे. नामांकन मागे घेण्याच्या दिवशी 125 पेक्षा जास्त बंडोबा थंडोबा झाले. त्यानंतर उरलेल्या 56 जणांना पक्षाने निष्कासीत केलं. तरीही भाजपसमोरची डोकेदुखी कमी होताना दिसत नाही.