पुणे : शाळकरी मुलीची छेड काढल्याचा जाब विचारला म्हणून रोडरोमियोनं मुलीच्या पालकांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवाय तिच्या घरापुढील गाडयांचीही तोडफोड केली आहे. यामुळं परिसरातल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मंगळवारपेठेत राहणा-या आशिष डांगे हा रोडरोमियो गांधी विकासनगरमधल्या मुलीची वारंवार छेड काढायचा. रस्त्यात अडवून तिला धमकवायचा. सततच्या त्रासाला कंटाळून मुलीनं याबाबत पालकांना सांगितलं. तिच्या पालकांनी याबाबत जाब विचारल्याचा आशिष डांगेला राग आला. त्यानंतर त्यांनं मित्रांना बोलावून मुलीच्या घराजवळच्या गाड्यांची तोडफोड केली.
मुलीच्या घरावर डांगेनं हल्लाही केला. याबाबत मुलीच्या पालकांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. दरम्यान रोडरोमियोंच्या वाढलेल्या हिमतीनं परिसरातल्या नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.