सांगली: सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय़. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि विजयानंतर आता अजित घोरपड्यांच्या भाजप प्रवेशामुळं सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
सांगली जिल्हा हा एकेकाळचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र याच बालेकिल्ल्यात आता राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविरोधात आपली उमेदवारी जाहीरही केलीय.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजितरावांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा उघड प्रचार केला होता. तासगाव कवठे महांकाळमधून संजय पाटलांना ३८ हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. हे लक्षात घेता अजितरावांची उमेदवारी आर आर पाटील यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.
दरम्यान अजितराव घोरपडे आणि ज्येष्ठ नेते विलासराव जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातले भाजप नेते अस्वस्थ झालेत. मोदी लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादीचे काही नेते आपली पोळी भाजून घेत असल्याची टीका त्यांनी केलीय. तसंच जतमधून निवडणून येण्यास कोणा राष्ट्रवादीच्या नेत्याची गरज नाही असं मत भाजपचे आमदार प्रकाश शेंडगे यांनी केलीय.
अजितरावांपाठोपाठ जिल्ह्यातले अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार हे निश्चित.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.