नाशिक : महापालिकेच्या शाळेतच एका मुख्याध्यापिकेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय.
नाशिकच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी किरण कुवर यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा आरोप महापालिका शाळेच्या निलंबित मुख्याध्यापिका सुरेखा खांडेकर यांनी केलाय.
किरण कुवर यांनी तीन महिन्यांपूर्वी खांडेकर यांना निलंबित केलंय. मुख्याध्यापिकेचं निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधी पक्षनेत्यासंह इतर नगरसेवकांनी बुधवारच्या महासभेत केला होता. त्या बरोबरच गणवेश खरेदी, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाला असून मनमानी कारभार करणाऱ्या कुवर यांना शासनाच्या मूळ सेवेत पाठविण्याची मागणी नगरसेवकांनी केलीय.
या विषयावर जवळपास साडेतीन तास काथ्याकूट झाल्यानंतर अखेर कुवर यांना शासनाच्या मूळसेवेत पाठवण्याचा निर्णय महापौरांनी जाहीर केला.
याच घटनेचा राग मनात घेऊन प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळाच्या कार्यालयातच मारहाण केल्याचं आरोप मुख्याध्यापिकेनं केलाय.
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. जिल्हा शासकीय रुग्णालयात मुख्याध्यापिकेला उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.