नागपूर : शिवसेनेचे आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि आपल्याला ते समर्थन द्यायलाही तयार आहेत, असा खळबळजनक दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. भाजप दिशाभूल करीत असल्याचे सेनेने म्हटलेय.
विविध राजकीय पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात असून ते आपल्याला समर्थन देण्यास तयार असल्याचं सुधीर मुनगंटीवार नागपूरमध्ये म्हणाले. विधानसभेत भाजपचे १२२ सदस्य असले तरीही आपल्या पक्षाला बहुमताची काळजी नसल्याचं मुनगंटीवारांचं म्हणणंय.
तसंच शिवसेनेनं मंत्रिमंडळात सहभागी होण्यासंबंधी चर्चा सुरु असून सेना आमदार मंत्रिमंडळात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका विसंगत असली तरीही भाजपची वेगळ्या राज्याची भूमिका कायम असल्याचं ते म्हणाले
दरम्यान, अशा वक्तव्यांनी भाजप संभ्रम निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.