'छत्रपती शिवाजी महाराज भाजपची मालमत्ता नाही'

शिवस्मारकाच्या भूमीपूजनावरून भाजपचा आणखी एक मित्र पक्ष नाराज झाला आहे.

Updated: Dec 23, 2016, 06:31 PM IST
'छत्रपती शिवाजी महाराज भाजपची मालमत्ता नाही' title=

मुंबई : शिवस्मारकाच्या भूमीपूजनावरून भाजपचा आणखी एक मित्र पक्ष नाराज झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी या कार्यक्रमावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

छत्रपती ही भाजपची मालमत्ता नाही. भाजपचा खासगी कार्यक्रम असल्यासारखंच भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन सुरू आहे, त्यामुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याची भूमीका राजू शेट्टी यांनी घेतलीय.

याआधी शिवस्मारकाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाचं राजकारण रंगलं. तसंच भाजपचे दुसरे मित्रपक्ष असलेले विनायक मेटेही शिवस्मारकावरून नाराज झाले. 'शिवस्मारक व्हावे हीच शिवसेनाप्रमुखांची इच्छा' असं प्रत्युत्तर शिवसेनेने दिलं आहे.

दरम्यान, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनाही भाजपने डावलले गेले आहे. मेटेंना डावलून स्मारकाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे यांची उपस्थिती होती. इतकंच नाही तर जलपूजन कार्यक्रमातही मेटेंना स्थान देण्यात आलेले नाही. आजच्या भाजपच्या चेंबूरमधील रॅलीतला उपस्थित न राहता विनायक मेटे थेट निघून गेले. मेटे यांच्यावर केवळ बीकेसी इथल्या कार्यक्रमात आभार प्रदर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे विनायक मेटे नाराज असल्याची चर्चा आहे.