मुंबई : बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि गोव्यामधील पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतेय.
पर्यटकांच्या वर्दळीनं किनारपट्टी गजबजलीय. अलिबागसह मुरूड, काशिद, दिवेआगर, हरिहरेश्वरचे किनारे हाऊसफुल्ल झालेत. पर्यटक स्पीडबोट, वॉटरस्पोर्टचा थरार अनुभवतायत. मुरूडचा ऐतिहासिक जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांनी रांगा लावलेल्या पहायला मिळाल्या.
सलग चार दिवस लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई पट्ट्यातल्या अनेकांनी पर्यटनाचे बेत आखले. त्यामुळे शुक्रवारी मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे, पुणे सातारा रस्ता, मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली पाहायला मिळाली. परिणामी या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
मुंबईहून पुण्याकडे जाताना एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली. खालापूर टोलनाक्यापासूनही पुढे हेच चित्र होतं. त्यातून पुण्याला जाताना वाहनाचालकांचे पुरते हाल झाले. तर पुणे सातारा रस्त्यावर खांबाटकी घाटातही ट्रॅफीक जॅम झालं. त्यामुळे पुणे सातारा प्रवासात मोठा खोळंबा निर्माण झाला होता. तर मुंबई गोवा महामार्गावरही पेण ते वडखळ नाका दरम्यान मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वडखळ नाक्याच्या अलिकडे तब्बल सात किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.