उद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा समाचार

Updated: Jun 25, 2014, 03:31 PM IST
उद्धव ठाकरेंनी घेतला मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा समाचार title=

 

पुणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लवासाचं समर्थन करणारे NCP अध्यक्ष शरद पवार यांचा खरपूस समाचार घेतला. शरद पवारांना जनसामान्यांचे मुलभूत प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळ दिसत नाही. त्यांना फक्त लवासासारखी आणखी शहरं हवीत, असा हल्ला ठाकरेंनी चढवला. 

उद्धव ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरूवात झाली असून, यानिमित्तानं पुण्यात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. ज्यांच्या हाताला लकवा भरला, अशी टीका झाली होती, ते मुख्यमंत्री निवडणुका आल्यावर कामाला लागलेत. त्यांचं सरकार जाहिरातींवर 100-200 कोटी रूपये खर्च करतंय. न केलेल्या कामांचं श्रेय मुख्यमंत्री लाटतायेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली.

तर आषाढी एकादशीला केल्या जाणाऱ्या विठ्ठल पूजेचा मान मुख्यमंत्र्यानाच का? असा सवालही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. युतीच्या काळात शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न असलेला मुंबई- पुणे एक्सप्रेस वे पूर्ण केला. मात्र त्याचे श्रेय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतले. त्यामुळं आघाडीला लोकसभेत पडलेला फटका पुरेसा नाही, त्यांना विधानसभेतही मोठा फटका देऊ असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.