महिला रणरागिणींनी दारूच्या दुकानांची केली तोडफोड

नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांनी रणरागिणी रूप धारण करून दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गेल्या वीस वर्षांपासून सुरु असलेल्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना तळीरामांच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याचा बांध अखेर फुटला आणि संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली. शिवसेनच्या माजी नगरसेवकाशी संबंधीत दुकान असल्याने यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 27, 2017, 08:49 PM IST
महिला रणरागिणींनी दारूच्या दुकानांची केली तोडफोड title=

मुकुल कुलकर्णी, नाशिक : नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांनी रणरागिणी रूप धारण करून दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गेल्या वीस वर्षांपासून सुरु असलेल्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना तळीरामांच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याचा बांध अखेर फुटला आणि संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली. शिवसेनच्या माजी नगरसेवकाशी संबंधीत दुकान असल्याने यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

सिडको परिसरात महाकाली चौकात राहणाऱ्या महिला दारूच्या दुकानाच्या दिशेने निघाल्या. चौकाच्या कोपऱ्यावरच भरवस्तीत १९९६ पासून शिवम हे देशी दारूचं दुकान सुरू आहे. घरांच्या आजूबाजूला देशीदारूचं दुकान असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, महिलांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच हायवे लगतची दारूची दुकानं बंद झाल्याने या दुकानावर तळीरामांची गर्दी वाढली होती. त्यामुळे महिलांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होऊ लागला होता.

अखेर महिलांच्या संयमाचा बांध फुटला आणि महाकाली चौकातील शिवम दुकान, तसंच दत्त चौकातलं दारूचं दुकान महिलांनी फोडलं. इथे पुन्हा दुकान सुरू होऊ नये, अशी आग्रही मागणी महिलांनी केली. स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन दारूच्या दुकानाची तोडफोड केली असली तरी या मोर्चाचं नेतृत्व स्थानिक भाजप नगरसेवकाने केलं. 

मात्र यात जी दोन दुकानं फोडली ती शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्याशी संबंधित असल्याने हल्ला घडवण्यात आला अशा आरोप करण्यात येतोय. महिलांच्या आंदोलनाला आता राजकारणाशी जोडलं जात असलं तरी गेल्या २० ते २२ वर्षांपासून जी घुसमट होत होती त्यातून हा उद्रेक झाला आणि रणरागिणी रस्त्यावर उतरल्या. कायदेशीर मार्गाने दुकान ठेवायचं की नाही याबाबत आता मतदान घेतलं जाणार आहे. त्यात बाटली आडवी होते की नाही यावरच आजच्या आंदोलनाचं यश अवलंबून आहे.