अलिबाग: शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही सत्तेची सुत्रं आपल्या हाती असल्याचा आनंद काहींनी व्यक्त केला, तर भाजपाला पाठिंबा देऊन पक्षानं धर्मनिरपेक्ष विचारधारेला सोडचिठ्ठी दिल्याची भावना काहींनी व्यक्त केली.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, माजी मंत्री जयंत पाटील, माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आपली परखड मतं मांडली. त्यांच्या मते, भाजपा सरकारला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेबाबत जनमानसांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे. त्याचा फटका पक्षाला बसतो. आपल्या पक्षाच्या भूमिकेत स्पष्टता असायला हवी आणि ती तितक्याच जोरकसपणे त्याचवेळी माध्यमांकडे मांडली गेली पाहिजे, असा आग्रहही या नेत्यांनी धरला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या पाठिंब्याबाबत दोन दिवसात केलेली उलटसुलट वक्तव्य आणि पक्षाच्या विचारधारेबाबत नेत्यांनीच व्यक्त केलेली शंका, असं राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या बैठकीत चित्र दिसलं.
‘पक्षाची विचारधारा’ या विषयावर विधानसभेचे माजी सभापती दिली वळसे पाटील यांचं भाषण झालं. आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे. पण राज्यात स्थैर्य राहावं यासाठी आपण भाजपाला पाठिंब्याची भूमिका घेतली, असं समर्थन त्यांनी केलं.
जातीयवादी पक्षांविरुद्ध आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड हे भाजपाला पाठिंबा देण्यावरून अस्वस्थ असल्याची चर्चा बैठकस्थळी होती. पक्षाच्या भूमिकेवरून दलित, मुस्लिम मतदारांच्या मनात संशय निर्माण केला जात आहे. त्यामुळं आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे आणि राहील हे आपण ठासनू सगळ्यांना सांगितलं पाहिजे, अशी आग्रही भूमिका आव्हाड यांनी मांडल्याचं कळतंय.
माजी मंत्री जयंत पाटील यांनी कालच्या भाषणात भाजपाला पाठिंबा देण्यावरून नाराजी व्यक्त केली होती, अशी चर्चा आहे. मात्र आपण तसं बोललो नसल्याचा खुलसाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींजवळ केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.