औरंगाबाद : नुकतंच म्हैसाळच्या गर्भपात प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून सोडले आ. मुली अजूनही इतक्या नकोशा का, असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र चित्र सगळीकडे सारखं नाही, कुठं मुलीच्या जन्मावर साखर वाटताय तर कुठं बँड बाजाच्या साथीने मुलींचे स्वागत करण्यात येते आहे. अशाच एका मुलीच्या जन्माच्या स्वागताचा हा मोठा आनंद सोहळा.
वाजणारा बँड, नाचणारे लोक, आणि मागे सजवलेली गाडी, एखाद्या लग्नाच्या थाटाला शोभेल असा काहीसा हा प्रकार आहे. मात्र प्रेक्षकांनो हा कुठल्याही लग्नाचा थाट नाही, तर हे आहे नुकत्याच जन्मलेल्या मुलीचं स्वागत. होय, औरंगाबादच्या हराळ कुटुंबात महिला दिनाच्याच दिवशी मुलीचा जन्म झाला आणि आज ती मुलगी घरी आली मग काय तिच्या स्वागताला कुटुंबियांनी कुठलीही कसर सोडली नाही.
सजवलेल्या गाडीत मुलगी, समोर नाचणारे वडील, आजोबा, आजी, आणि मावश्या अशा थाटात मुलीचं घरात स्वागत करण्यात आलं. नाचतांना सुद्दा लेक वाचवा असा संदेश खूप काही सांगून जात होता. मुलीचं आई सोबत पहिलं पाऊल घरात पडलं ते औक्षणानं, ख-या अर्थाने या लक्ष्मीच्या स्वागताचा हा आगळा वेगळा सोहळा कुटूंबियांनी साजरा केला.
घरात येणा-या या नव्या पाहूण्याच्या आगमनाचा आनंद एकमेकांना पेढा भरवून सगळ्यांनी साजरा केला. घर असं सजवण्यात आलं होतं. आजी - आजोबा यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला होता.
एकीकडे मुलगी नकोशी असं दुर्दैवी चित्र आपण पाहतो तर दुसरीकडे हराळ कुटुंबीयांकडून होत असलेल्या मुलीच्या जन्माचं स्वागत निश्चितच कौतुकास्पद आहे.