मुकूल कुलकर्णी, नाशिक : बेरोजगार महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघड झालाय. गोळ्या, चॉकोलेटला पॅकींग करण्याच्या व्यवसायाचं आमीष दाखवून डिपॉझिटच्या नावाखाली लाखो रूपये गोळा करून एका ठकाने गोरगरीब महिलांची फसवणूक केलीय.
चॉकलेट, गोळ्यांना घरच्या घरी पॅकींग करण्याच्या व्यवसायाची जाहिरात स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आरएसडी कंपनीच्या राजेंद्र देवकाते याच्याशी महिलांनी संपर्क साधला. पेठरोडवरील एका संकुलात त्याने आपलं कार्यालय थाटलं होतं. एक किलो गोळ्यांच्या पॅकींगसाठी तो महिलांना २५ रूपये द्यायचा.
मात्र, जेवढ्या गोळ्या पॅकींग करण्यासाठी द्यायचा त्याच्या कित्येक पट जास्त रक्कम तो डिपॉझिट म्हणून जमा करायचा. १० हजारापासून ते एक लाखांपर्यंतची रक्कम त्याने गोळा केली होती. मात्र, जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आली तेव्हा आपला गाशा गुंडाळून देवकाते नाशिकबाहेर फरार झाला, अशी तक्रार पीडित महिलांनी केलीय.
गेल्या महिना दीड महिन्यापासून राजेंद्र देवकातेचा कोणताही थांगपत्ता नाही. कार्यालयावरही टाळं लागलंय. फोनवरूनही संपर्क होत नाहीय. अखेर फसवणूक झालेल्या महिलांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.
सुरूवातीला गुन्ह्याचं स्वरूप छोटं दिसत असलं तरी फसवणूक झालेल्या महिला या हातावर पोट भरणाऱ्या वर्गातल्या आहेत. त्यांच्यासाठी दहा ते वीस हजारांची रक्कमही खूप मोठी आहे. राजेंद्र देवकातेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथकं रवाना केली आहेत.