पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं धाडस दाखवलं आहे, राज्यातील माफियाराज विरोधात फडणवीस यांनी कंबर कसली असल्याचं म्हटलं आहे.
कायद्याचे राज्य स्थापन करण्यासाठी मुजोर झालेल्या लॅण्ड, सॅण्ड आणि रेशन माफियांना चिरडून टाका, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कोणी काही चुकीचे करत असले, तर त्याच्यावर कडक कारवाई करा; सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी उभे राहिल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची दोन दिवसांची महसूल परिषद पुण्यात यशदा येथे आयोजित करण्यात आली होती.
फडणवीस यांच्या उपस्थितीत तिचा समारोप झाला. यावेळी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षेत्रीय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.
आपले कोणी काहीही करू शकत नाही, असे मुजोर माफियांना वाटते. त्यामुळे या माफियांना चिरडून काढण्यासाठी आवश्यक असलेलेल सर्व दल-बल पुरविले जाईल.
कारवाई करताना काही अडचणी आल्या तर थेट माझ्याशी संपर्क करा. तुमच्या जिवाला धोका असल्यास तसा एसएमएस करा. योग्य संरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.