'झी मीडिया'समोर अन्यायाला वाचा फोडली म्हणून 4 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग

औरंगाबादच्या एमआयडीसी फायर बिग्रेड विभागातल्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत 'झी मीडिया'मार्फत कैफियत मांडणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आलीय. 

Updated: Apr 8, 2015, 05:54 PM IST
'झी मीडिया'समोर अन्यायाला वाचा फोडली म्हणून 4 कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या एमआयडीसी फायर बिग्रेड विभागातल्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत 'झी मीडिया'मार्फत कैफियत मांडणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आलीय. 

महामंडळाची बदनामी केल्याचा ठपका एमआयडीसीच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी बजावलेल्या या नोटीशीमध्ये आलाय. याबाबत सात दिवसांत खुलासा करण्यास सांगण्यात आलंय. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणं, हा कर्मचाऱ्यांचा लोकशाही हक्क महामंडळाला अमान्य आहे का? हा प्रश्न आहे. प्रशासनानं या अडचणी समजून घेऊन समस्या सोडवण्याऐवजी कर्मचाऱ्यांवर कारवाईचं अस्त्र उगारण्याचा हा कुठला न्याय...? एमआयडीसीचे मुख्य संचालक भूषण गगराणी आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई याकडे लक्ष देणार का?

'झी मीडिया'नं समोर आणलेल्या रिपोर्टमध्ये महामंडळाची बदनामी झालीय की कर्मचाऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडण्याचं आमचं काम आम्ही केलंय... तुम्हीच बघा आणि खात्री करा... 

औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यात अतिरिक्त कामाचा मनस्ताप आणि वरिष्ठांचा जाच याचा उद्रेक जाणवतो.  कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या असुविधा आणि मानसिक छळानं या कर्मचाऱ्यांना जणू बंडाच्या पवित्र्यात आणलंय. 

वाळूजच्या केंद्रात नियमानुसार 32 कर्मचारी अपेक्षित असताना इथला कारभार केवळ 8 कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर आहे. त्यात परिसरातल्या 3 हजार 500 कंपन्यांसाठी केवळ एक फायर इंजिन आणि यावर 24 तास 12 महिने ड्रायव्हरही एकच... त्यामुळं या कर्मचाऱ्यांना नियमानुसार शिफ्ट संपली तरी बाहेर जाण्यावर कडक निर्बंध असतात. त्यात 24 तास काम करूनही पगार मिळतो तो केवळ आठच तासांचाच... ड्यूटी शिट भरण्याची परवानगीच या कर्मचाऱ्यांना नाही. कर्मचाऱ्यांनी ड्युटी शीटमध्ये ओव्हरटाईम दाखवला की लगेच वरिष्ठांकडून नोटीस मिळते. फक्त कोऱ्या ड्युटी शिटवर साईन करायचं हा जणू इथला शिरस्ता... त्यात एखाद्यानं बंड केलं तर त्याच्या खोट्या सह्या मारल्या जातात.

अरविंद चौधरी या कर्मचाऱ्याच्या ड्युटी शिटमध्ये अशा खोट्या सह्या मारण्यात आल्या. हस्ताक्षर तज्ज्ञाकडून त्यानं या सह्या खोट्या असल्याचा पुरावाही मिळवलाय. मात्र, इथल्या प्रशासनाला काहीही फरत पडत नाही. मिळणाऱ्या या पगाराबद्दल आणि वागणुकीबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. हा प्रकार फक्त इथंच थांबत नाही. कर्मचाऱ्यांनी याचा जाब  विचारला तर थेट बदली केली जाते आणि तीही 500 किलोमीटर दूर... अशाच काही कर्मचाऱ्यांनी 'झी 24 तास'कडं आपली कैफियत मांडलीय. 

आग विझवताना अनेक वेळा जीव मुठीत घेऊन काम करावं लागतं. मात्र या विभागातील राज्यातल्या सर्वच कर्मचाऱ्यांना साधी विम्याची सुविधाही नाही म्हणजे प्राण गेला तर जणू कर्मचाऱ्यांचीच चूक...

अनेक पायाभूत सोयीसुविधांचा या ठिकाणी अभावच आहे. म्हणजे केवळ चालवायचं म्हणून चालवायचं असंच जणू या अग्निशमन केंद्राचं काम सुरुय. राज्यातल्या 26 फायर स्टेशन्सवर सुद्धा यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नसल्याचं कर्मचारी सांगतायत. केवळ 377 कर्मचा-यांवर आपत्कालीन सेवेचा हा डोलारा चालणार तरी कसा असा प्रश्न या कर्मचा-यांना पडलाय. किमान प्रशासनानं आणि खात्याच्या मंत्र्यानी या परिस्थितीची दखल घ्यावी इतकीच मागणी या कर्मचाऱ्यांची आहे.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.