मुंबई : मुंबई आणि ठाण्यात काल रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावलीय. शहर आणि उपनगरात सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. तसंच रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय.सकाळच्या वेळी कामावर बाहेर पडणा-यांचीही या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडालीय.मात्र या पावसातही लोकलसेवा सुरळीत असली तरी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा 10 ते 20 मिनेट उशिराने सुरु आहे.
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. येत्या २४ तासांत पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे मुंबईसाठी आजचा बुधवार हा पाऊसवार ठरण्याची शक्यता आहे. तर मुंबईतल्या गोरेगावमध्ये मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास काकाजीनगर भागात प्रसाद शॉपिंग सेंटरमधील एका दुकानाचा स्लॅब कोसळलाय. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. परशुराम यादव आणि नासीर अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर सहा जण जखमी झालेत. जखमींवर सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूयत. संततधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचं समजतंय.
मुंबईमध्ये मंगळवारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत दिवसभर पावसाच्या सरी बरसल्या. उपनगरांमध्येही मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले. मुलुंडमधल्या एलबीएस रस्त्यावरही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल झाले. पावसाचा शहरातल्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. पूर्ण आणि पश्चिम द्रुदगती मार्गांवरील वाहतूक काही काळ धीम्या गतीनं सुरू होती. तसच लोकलचं वेळापत्रकही विस्कळीत झालं होतं.
गेल्या २४ तासांत कुलाब्यात ५६ मीमी तर सांताकृजमध्ये २६ मीमी पावसाची नोंद झाली. मुंबईत दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.