आरपीआयची मुख्यमंत्री कार्यालयावर धडक

इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.

Updated: Dec 7, 2011, 02:17 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई
इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.

 

इंदू मिलची जागा तातडीने बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सोपवावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलीय. तसेच दादर स्टेशनला डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावं द्यावं अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली..

 

इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी मिळालीच पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर झिंदाबाद अशा घोषणा देत आरपीआय आठवले गटाचे १०-१२ कार्यकर्ते आज मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचले.

 

त्याठिकाणी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आली. इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी मिळून देण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्यस्थी करावी, अशी मागणी आंदोलक आरपीआय कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

 

दरम्यान, येत्या १५ दिवसात याबाबतचा निर्णय झाला नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

 

याच मागणीसाठी काल महापरिनिर्वाणदिनी आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सातशे ते आठशे आंबेडकर अनुयायांनी मिलचा ताबा घेतला होता. स्मारकाची घोषणा होत नाही तोपर्यंत मिलमधून हटणार नाही, असे सांगत आंदोलकांनी मिलमध्ये ठिय्या दिला असून मिलमध्ये त्यांनी गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापनाही केली.