कस्टम विभागाला लवकरच येणार जाग

आयात-निर्यातीतली तस्करी रोखण्यासाठी कस्टम विभागानं पावलं उचलली आहेत. त्यासाठी बायोमेट्रीक कार्डचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यातून एजंट मार्फत होणारा प्रत्येक व्यवहाराची माहिती राहणार आहे.

Updated: Feb 26, 2012, 10:12 AM IST

www.24taas.com, मुंबई

आयात-निर्यातीतली तस्करी रोखण्यासाठी कस्टम विभागानं पावलं उचलली आहेत. त्यासाठी बायोमेट्रीक कार्डचा पर्याय निवडण्यात आला आहे. त्यातून एजंट मार्फत होणारा प्रत्येक व्यवहाराची माहिती राहणार आहे.

मुंबईसह देशाच्या विविध भागात आयात-निर्यातीच्या आडून तस्करी केली जाते. त्याला पायबंद घालण्यासाठी कस्टम विभागानं बायोमेट्रीक कार्डची योजना सुरु केली आहे. त्यानुसार आयात-निर्यात करणाऱ्या एजंटला कस्टम विभागाकडं नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्याच्या आधारे एक बायोमेट्रीक कार्ड दिलं जाणार आहे. कार्डमध्ये एजंटची पुर्ण माहिती आणि त्याच्या बोटांचे ठसे असतील. एजंटला प्रत्येक व्यवहारावेळी कार्ड दाखवावं लागेल.

आयात-निर्यातीच्या आडून अनेक वेळा तस्करीच्या घटना पुढं येतात. कधी परदेशी गाड्यांचे पार्ट्स मागवून त्यांना असेंबल करुन ते विकले जातात. तर काही वेळा त्याच्या आडून चंदन तस्करी केली जाते. बायोमेट्रीक कार्ड केल्यावर बेकायदा व्यवहारांना आळा बसणार आहे. पहिल्या टप्प्यात २५ हजार बायोमेट्रीक कार्ड तयार केली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.