www.24taas.com, मुंबई
महागाई, दहशतवाद, नक्षलवाद यासारख्या मुद्द्यांवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुंबईत पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा समारोपाच्या जाहीर सभेत मराठीत भाषणाला सुरुवात करुन, मोदींनी सुरुवातीलाच उपस्थितांची मनं जिंकली.
तब्बल ४० मिनिटांच्या भाषणात दुष्काळ, सरकारची ध्येय-धोरणं, ऊर्जा, कृषी क्षेत्रातील प्रगती या मुद्द्यांचा आधार घेत त्यांनी युपीए सरकार आणि पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. सरकार आणि निर्मलबाबा सारखेच असल्याचं सांगत, सोनिया गांधींनी केवळ आश्वासन दिलं मात्र कामगिरी करुन दाखवली नाही, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यांना महापालिकेसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत, एनसीटीसी सारख्या कायद्याची गरजच काय? असा प्रश्नही त्यांनी यानिमित्तानं उपस्थित केला. रुपयाची घसरण हे षडयंत्र तर नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. एकूणच भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार आपणच आहोत, हे यानिमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. तर नितीन गडकरींसह इतर बड्या नेत्यांनीही यूपीए सरकारवर पेट्रोल दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरुन जोरदार हल्लाबोल केला. २०१४ पूर्वीच देशात एनडीचं सरकार येईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
या सभेत माहौल मात्र सबकुछ मोदी असाच राहिला. या सभेच्या निमित्तानं भाजपात नव्या गडकरी-मोदी पर्वाची सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं. तर लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांनी सभेतली अनुपस्थिती अनेकांचं लक्ष वेधणारी ठरली.
मोदींचं मुंबईतलं जाहीर सभेतलं भाषण ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
[jwplayer mediaid="108505"]