भरत मुंबईत आला परत

इटलीच्या समुद्रात गेल्या शुक्रवारी बुडालेल्या 'कोस्टा कॉंकॉर्डिया' या आलिशान जहाजावर मृत्यूला हुलकावणी देऊन बचावलेले २०१ भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले आहेत. या क्रुझवर 'बार टेंडर' म्हणून काम करणारे कळवा येथील भरत पैठणकर १६ सहकाऱ्यांसह मुंबई विमानतळावर दाखल झाले.

Updated: Jan 20, 2012, 12:38 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

इटलीच्या समुद्रात गेल्या शुक्रवारी बुडालेल्या 'कोस्टा कॉंकॉर्डिया' या आलिशान जहाजावर मृत्यूला हुलकावणी देऊन बचावलेले २०१ भारतीय नागरिक मायदेशी परतू लागले आहेत. या क्रुझवर 'बार टेंडर' म्हणून काम करणारे कळवा येथील भरत पैठणकर १६ सहकाऱ्यांसह मुंबई विमानतळावर दाखल झाले.

 

 

मुंबई, ठाणे, वसई आणि उपनगरांत राहणाऱ्या या १७ जणांच्या स्वागतासाठी नातेवाईक, मित्रमंडळींनी विमानतळावर हार आणि पुष्पगुच्छ घेऊन गर्दी केली होती.  जहाज अपघातातून बचावलेल्या व्यक्तींना घेऊन सायंकाळी पावणेसहा वाजता 'अमिराती एअरवेज'चे विमान रोम आणि दुबईमार्गे मुंबईत दाखल झाले. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर नातेवाईक आणि बचावलेल्यांची गळाभेट झाली.

 

 

कोस्टा कॉंकॉर्डिया या जहाजावर नेहमीप्रमाणे काम सुरू होते.  ४००० प्रवासी आणि ११०० 'क्रू' सागरी सफरीचा आनंद घेत होते. अचानक 'क्रुझ'ला   धक्का बसला आणि धावपळ सुरू झाली. अनेकांनी आरडोओरडा केली. जीवाचा थरकाप उडविणाऱ्या किंकाळ्या कानावर पडत होत्या. काय करायचे ते समजत नव्हते. मात्र, याही परिस्थित काहींनी मदतीसाठी धाव घेतली. काहींच्या अंगावर केबिन कोसळण्याची शक्यता होती. त्यातून बचावल्याने आज आम्ही मुंबईत पाऊल ठेवलं आहे. तर काहींनी प्रवाशांना लाईफ बोटींमध्ये बसवून किनाऱ्यावर सुरक्षित पाठविले. किनाऱ्यावर आल्यानंतरही मनातली भीती कायम होती. अनेक जणांनी अक्षरशः रडून काढले. त्या जीवघेण्या अपघातातून बचावल्याचेच आम्हाला आश्‍चर्य वाटते, अशी येथे दाखल झालेल्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

 

पैठणकर यांच्यासह विमानातून मायदेशी परतलेले राहुल राघव, पॅट्रिक पिंटो, मोबिन शेख, राजेश कोलासा, रमेश पटेल, महेश सामंता यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार विमानतळावर स्वागतासाठी हजर होता.   पुन्हा क्रुझवर काम न करण्याचा निर्धार पैठणकर यांनी केला आहे. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी त्रिशा आणि तनुष या दोन लहानग्यांसह पत्नी नर्मदा हजर होत्या. त्रिशा त्यांना बिलगली, तर नर्मदा यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा प्रसंग पाहून उपस्थितांची मने भरून आलीत.

 

[jwplayer mediaid="32825"]